मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या 500 कोटींच्या आरोपावरुन, ऑडिओ क्लिपवरुन सध्या रणकंदन माजलं आहे. त्यावरुन, महायुतीमध्येच दोन पक्ष आमने-सामने आल्याचं चित्र आहे. शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांचे फोटो दाखवत आणि प्रवीण दरेकर यांचे नाव घेऊन गंभीर आरोप केले. तसेच, व्हायरल ऑडिओ क्लिप भाजपाचीच असल्याचंही म्हटलं. त्यानंतर, आता आमदार प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर पलटवार केला आहे. रामदास कदम हे फालतू धंदे बंद करा, तुमच्याही क्लिप्स आमच्याकडे आहेत, अशा शब्दात थेट इशाराच दिलाय.
आम्ही सगळ्यांनी मुख्यमंत्री यांना निवेदन दिलं की, मनोज जरांगे यांनी सुनावलेल्या ऑडिओ क्लिपबाबत चौकशी व्हावी. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सायबर विभागाला याबाबतचे निर्देश दिले आहेत. रामदास कदम यांनी भाजप आणि माझ्यावर मोठे आरोप केले, आम्ही महायुतीतील सर्व नेत्यांना आपलं मानतो. जेव्हा मनोज जरांगेंनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली, आम्ही भाजपच्या नेत्यांनी उत्तर दिले, असे म्हणत प्रसाद लाड यांनी रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावरुन पलटवार केला.
आम्हीपण छाती उघडी ठेऊन मनोज जरांगे यांना भेटतो, त्यामुळे रामदास कदम... फालतू धंदे बंद करा. संजय राऊत यांच्यामुळे शिवसेना डुबवायला निघाले आहेत, तसे रामदास कदम हे एकनाथ शिंदेंची शिवसेना डुबवायला निघाले आहेत. रामदास भाई आवाज वाढवून बोललात म्हणजे आम्ही घाबरलो असं नाही, असे म्हणत रामदास कदम यांच्यावर प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिलं.
तुम्ही सिनियर सिटीजन आहात, रामदास कदम यांनी माहिती घेऊन बोलायला हवं होतं. पत्रकार परिषदेपूर्वी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणं केलं नसेल. एकनाथ शिंदे यांना आम्ही सर्वांनी आमचा नेता म्हणून मान्य केलं आहे. जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली, तेव्हा रामदास कदम कुठे होते? आम्ही त्यावेळी जरांगेंना अंगावर घेतलं होतं. याच शिंदेसाहेब आणि त्यांच्या मुलाबाबत रामदास कदम मागे काय बोलतात हे आम्ही बाहेर काढलं तर त्रास होईल? अशा शब्दात प्रसाद लाड यांनी रामदास कदमांना थेट इशाराच दिलाय.